छत्रपती संभाजीनगर : महायुती सरकारच्या खोट्या आश्वासनांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाली असून, आज बुधवार (११ जून) रोजी क्रांती चौकातून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी, सन्मान योजना, पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता योजना यांसारख्या अनेक योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या केवळ घोषणाच राहिल्या असून शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडलेले नाही, अशी तीव्र टीका दानवे यांनी यावेळी केली.
दानवे पुढे म्हणाले की, “गेल्या सात महिन्यांत राज्यातील 1000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आर्थिक संकटात असताना अर्थमंत्री अजित पवार मात्र त्यांना कर्जफेडीचे आवाहन करत आहेत. जीएसटी अनुदान परत देण्याचे आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही.”
मोदी सरकारने हमीभावाच्या दीडपट दराचे आश्वासन दिले असले, तरी सध्या कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात विकावे लागत आहे. शिवाय, परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात सुरू असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्रांती चौकातून सुरू झालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. ‘क्या हुआ तेरा वादा’ या घोषणेखाली हा मोर्चा निघाला असून सरकारने दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरत असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*