वाळूज महानगर :  माणूस परक्यांकडून जरी त्रास सहन केला तरी सहन करतो, पण जेव्हा स्वतःचेच आई-वडील छळ करतात, तेव्हा मनाचा कोलमडलेला कोपरा ओळखणंही कठीण होतं. अशीच एक हृदयद्रावक घटना रांजणगाव येथे उघडकीस आली आहे. चपात्या नीट येत नाहीत म्हणून आईने आपल्या पोटच्या मुलीच्या हाताला चिमट्याने चटके दिले, तिला जेवण दिले नाही, बाथरूम आणि गच्चीवर झोपायला लावले… ही पीडा सोसणारी ‘सीमा’ (नाव बदलले आहे) आज एका बालगृहात सुरक्षित आहे, पण तिच्या मनावरचे जखमेचे व्रण किती खोल आहेत, हे समजणं कठीण आहे.

राजस्थानमध्ये आजी-आजोबांच्या कुशीत वाढलेली १७ वर्षांची सीमा लॉकडाऊनच्या काळात (२०१९) आई-वडिलांसोबत राहण्यासाठी रांजणगाव येथे आली. घरात आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ, पण कुणीही तिला प्रेम दिलं नाही. आईकडून घरकाम करून घेतलं जात होतं आणि चपात्या नीट बनवल्या नाहीत म्हणून तिला चटके दिले जात होते. एव्हढ्यावरच न थांबता, तिला जेवण न देता, बाथरूममध्ये किंवा गच्चीवर राहायला सांगितले जात होते.

सीमाला कधी शाळेचा वसा लागणार, कधी बालपण अनुभवायला मिळणार, या प्रश्नांनी तिच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. एकदा तिच्या नातेवाइकांच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंब राजस्थानला गेले, तेव्हा सीमा वर्षभर दुसऱ्या नातेवाइकांकडे राहिली. पण तिथेही “तुझे घरचे पैसे पाठवत नाहीत” म्हणत तिचं शिक्षण थांबवलं गेलं. अखेर सीमाला बालविकास केंद्रात नेण्यात आले. काही दिवसांनी वडील व भाऊ तिला पुन्हा रांजणगावला घेऊन आले, पण यातूनही तिचा त्रास कमी झाला नाही. उलट पुन्हा तिच्यावर अन्याय सुरू झाला.

दामिनी पथकाने याची गंभीर दखल घेत सीमाला त्वरित बाल कल्याण समितीसमोर हजर केले. तिच्या स्पष्ट नकारानंतर ९ जानेवारी २०२४ रोजी सीमाला बालगृहात ठेवण्यात आले. अखेर १३ जुलै रोजी सीमाने हिम्मत एकवटून पोलिसांत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार करीत आहेत.

सीमा आता सुरक्षित आहे. पण तिच्या भावनांचं काय? तिच्या हरवलेल्या बालपणाचं काय? जेव्हा घर असतं तरी त्यात “घरपण” नसेल, तेव्हा त्या घरात राहणं म्हणजे जगण्याचा एक एक क्षण मरणासमान असतो. सीमा याला अपवाद नव्हती. ती आजही तिच्या नव्या जीवनाच्या शोधात आहे… कुणाच्या प्रेमळ मिठीत मोकळं रडण्यासाठी.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,038 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क