छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मनपाच्या मोंढा नाका वॉर्ड कार्यालयात जन्म प्रमाणपत्रातील नाव दुरुस्ती करण्यासाठी तब्बल तीन हजार रुपयांची मागणी करून दोन हजारांची लाच घेताना दोन महिला सफाई कामगारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (२२ ऑगस्ट) सायंकाळी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिकाने आपल्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात नाव दुरुस्तीसाठी मोंढा नाका वॉर्ड कार्यालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, बराच काळ उलटूनही त्याचे काम झाले नाही. त्यावर कार्यालयातील महिला सफाई कामगार शोभा मिठू आहेरकर (५६, रा. राहुलनगर) आणि वर्षा वसंत महिरे (३६, रा. कोटला कॉलनी) यांनी त्यांच्याकडे थेट तीन हजार रुपयांची मागणी केली. काम पूर्ण करण्यासाठी पैसे देण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

या प्रकारामुळे संतप्त तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथकाने पडताळणी केली. त्यात दोन्ही महिलांनी तीन हजार रुपयांची मागणी करून तडजोडीत दोन हजार रुपयांवर सौदा केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक धर्मराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली वाल्मीक कोरे, राजेंद्र जोशी, पुष्पा दराडे, आशा कुंटे आणि युवराज हिवाळे या पथकाने वॉर्ड कार्यालयात सापळा रचला. सापळ्यात दोन्ही महिला दोन हजार रुपये स्वीकारताना पकडल्या गेल्या.

ही कारवाई झाल्यानंतर महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. अधिकार नसतानाही महिलांनी हे काम कसे हाती घेतले, त्यांना कोणी पुढे केले, याची चौकशी होणार का, याबाबत मनपात चर्चा रंगली आहे. एसीबी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,427 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क