मुंबई : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तुपे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून तुपे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. मात्र, योग्य वेळ मिळत नव्हता. अखेर गणपती बाप्पाच्या आगमनाच्या काही तास आधीच त्यांनी पक्षप्रवेश केला. तुपे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटात सातवा माजी महापौर सामील झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी ही मोठी नामुष्कीची बाब मानली जाते, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी सुरू असताना हा धक्का बसला आहे.
अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिव संपर्क मोहिमेची तयारी करण्यासाठी शिबीर भरले होते. या पार्श्वभूमीवर पक्षातून बाहेर पडणे पुन्हा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुपे यांनी नुकताच खासदार विनायक राऊत यांच्याकडे सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात होता.
37 वर्षांचा प्रदीर्घ काळ तुपे यांनी शिवसेनेत घालवला असून, या कालावधीत त्यांनी महापौर, सभागृह नेते पदासह महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मात्र, अखेर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. याआधीच माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, कला ओझा, किशनचंद तनवाणी, विकास जैन, गजानन बारवाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
त्र्यंबक तुपे यांच्या रुपाने आणखी एका माजी महापौराची भर पडल्याने उद्धव ठाकरेंच्या गटातील संकट अधिक गडद झाले आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*