छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी शिवारात शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत दोन शाळकरी मुलांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असून, या घटनेमुळे भगूर आणि महालगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलांची नावे मयूर किशोर मोईन (१५) आणि साहिल संतोष झाल्टे (१५, दोघेही रा. भगूर, ता. वैजापूर) अशी आहेत. दोघेही महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरहरी रांजणगाव येथील गट क्रमांक २०४ मधील खासगी खदानीत हे चौघे मित्र शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. मात्र, खदानीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने मयूर आणि साहिल हे दोघे पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत गेलेले इतर दोन मित्र कसाबसा किनाऱ्यावर पोहचले आणि तातडीने मदतीसाठी हाका मारल्या. ही माहिती मिळताच बीट अंमलदार विनोद बिघोत यांनी पदमपुरा अग्निशमन केंद्राला कळविले.

उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ड्यूटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान दिनेश मुंगसे, छत्रपती केकाण, विशाल घरडे, प्रणाल सूर्यवंशी, सचिन शिंदे, मनसूबराव सपकाळ, प्रशांत गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

पावसाळ्यामुळे परिसरातील खदानी पाण्याने भरलेल्या असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. नवीन ठिकाणी पोहण्यासाठी जाणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण भोजने, बीट अंमलदार बिघोत व बाबा शेख यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

1,149 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क