छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १४) रात्री उशिरा घडली असून, गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली. अटकेतील आरोपीचे नाव सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (वय २४, रा. जुना बायजीपुरा) असे आहे. या आरोपीविरुद्ध यापूर्वीही जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
सचिन आणि मृत सुरेश भगवान उंबरकर हे दोघे बालमित्र होते. दोघांमध्ये नेहमीच घट्ट मैत्री असल्यामुळे ते सतत सोबतच राहत. सचिन हा जवाहर कॉलनी रोडवरील ‘प्रिन्स अंडा ऑम्लेट’ या गाडीवर काम करत होता. मंगळवारी सुरेश दिवसभर सचिनसोबत फिरत होता. रात्री उशिरा दोघेही नशा करण्यासाठी एसएफएस मैदानावर गेले. त्याचदरम्यान त्यांच्या एका मैत्रिणीवरून वाद झाला. वाद चिघळत गेला आणि नशेच्या भरात सचिनने रागाच्या आवेशात धारदार शस्त्राने सुरेशच्या गळ्यावर वार केला. क्षणात मैदानावर रक्ताचा सडा पडला आणि सुरेश जागीच कोसळला.
आपला मित्र रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेला पाहून सचिन घाबरला आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळानंतर लघुशंकेसाठी गेलेल्या एका नागरिकाला मैदानावर मृतदेह दिसल्याने पोलिसांना खबर देण्यात आली. तत्काळ गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी आणि जवाहरनगरचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय गावंडे, सुनील जाधव, योगेश नवसारे, सोमकांत भालेराव आणि राजेश यदमळ यांच्या पथकाने कैलासनगर परिसरातील मैदानात आरोपी सचिनला बसलेले आढळला. पोलिस जवळ गेल्यावरही तो शांत बसलेला होता. तपासादरम्यान त्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या. चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, क्षणिक राग आणि नशेच्या भरात दोन बालमित्रांतील घट्ट नातेसंबंध रक्तरंजित वळण घेतल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*