छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला अखेर क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मनोहर लिंबाजी चव्हाण या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांनी आरोपीला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती शहरात डेटा सायन्सचा कोर्स करत होती. आरोपी मनोहर चव्हाण हा तिचा ओळखीचा होता आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. वर्ष २०२२ पासून आरोपी पीडितेला भेटण्यासाठी शहरात येत होता. या काळात दोघे विविध लॉजमध्ये भेटत असत. लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र, लग्नाचा विषय पुढे आल्यानंतर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
जुलै २०२५ मध्ये आरोपीने शहरातील एका लॉजमध्ये पीडितेला बोलावून घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेने प्रथम गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, घटनास्थळ छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने प्रकरण क्रांती चौक पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
सहाय्यक सरकारी वकील आनंद पाईकराव यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून, त्याने अशा स्वरूपाचे इतर गुन्हे केले आहेत का याचा तपास आवश्यक आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयानेही ती मान्य करून आरोपीला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*