छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील बँक ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) चालकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण टोळीतील दोघांना ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्याने अटक केली आहे. राहिल युनूस शेख (३७, रा. वडाळा शिवार, नाशिक) आणि प्रवीण चंपालाल वैष्णव (४७, रा. सिन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यातील राजंणगाव पोळ, गंगापूर, ढोरकीन आणि वेरुळ परिसरातील अनेक सीएसपी चालकांना या आरोपींनी लाखो रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणात सीएसपी चालक राजू कचरु कुकलारे यांच्या तक्रारीनंतर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

फसवणुकीची पद्धत अत्यंत योजनाबद्ध होती. आरोपी थेट सीएसपी केंद्रांवर जाऊन “अत्यंत गरज आहे”, “रुग्णालयाचे बिल द्यायचे आहे”, “मजुरांचे पेमेंट करायचे आहे”, “गाडी रस्त्यात बंद पडली” अशा कारणांखाली रोख रकमेसाठी विनंती करत असत. आमचे नातेवाईक ऑनलाइन पैसे पाठवतील, त्यामुळे तुमचा फोन पे नंबर द्या, असा विश्वास बसवून ते सीएसपी चालकाच्या खात्यात ऑनलाइन रक्कम पाठवित. काही क्षणांत पैसे आल्यावर आरोपी ५० ते ८० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढत.

फसवणुकीचा दुसरा टप्पा आणखी गंभीर होता. रोख रक्कम घेतल्यानंतर काही वेळातच आरोपी किंवा त्यांचे साथीदार अनोळखी नंबरवरून सीएसपी चालकाला फोन करून “तुमच्या खात्यात चुकून पैसे गेले आहेत” असे सांगत आणि सायबर टोल फ्री नंबर १९३० वर तक्रार करण्यास भाग पाडत. तक्रार झाल्यावर सेंटर चालकाचे खाते गोठवले जाई आणि त्यांनी आधी दिलेली रक्कम न्यायालयीन प्रक्रियेनंतर परत घेत आरोपी दुहेरी फसवणूक करीत असत.

या गुन्ह्याचा तपास तांत्रिक पद्धतीने करताना पोलिसांना आरोपी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरातून पाठलाग करून दोघांना शिताफीने पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून कारसह ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीने श्रीरामपूर, संगमनेर, जालना, जळगाव, मुक्ताईनगर, देऊळगावराजा, बुलढाणा आणि मध्य प्रदेशासह अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा ग्रामीण सायबर पोलिसांनी या कारवाईनंतर इतर सीएसपी चालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,538 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क