छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेने चुकून चुकीच्या रूमचे दार वाजवल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील तिघांनी तिला जबरदस्तीने खोलीत ओढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर वेदांतनगर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली.
पीडिता खासगी रुग्णालयात काम करत असून तिचा पती खासगी कंपनीत नोकरीला आहे. आर्थिक गरज असल्याने तिने भोकरदन येथील मित्राकडे पैसे मागितले होते. त्या मित्राने तिला बुधवारी रात्री रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. हॉटेलमधील १०५ क्रमांकाच्या खोलीत दोघांनी मद्यप्राशन व जेवण केले. रात्री सुमारे अकराच्या सुमारास पीडिता फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेली होती. परत येताना चुकून तिने १०५ ऐवजी २०५ क्रमांकाच्या खोलीचे दार ठोठावले.
त्या खोलीत घनश्याम भाऊलाल राठोड (२७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (२५) आणि किरण लक्ष्मण राठोड (२५) हे तिघे मद्यपान करत होते. त्यांनी महिलेवर बळजबरी करत दार बंद करून घेतले व जबरदस्तीने मद्य पाजून पहाटेपर्यंत आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान पीडितेने संधी साधत आरडाओरड केली आणि हॉटेलमधून पळ काढला. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, बुकिंगची माहिती आणि मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर परिसरातून तिन्ही आरोपींना अवघ्या तीन तासांत अटक करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*