छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी दुपारी एका १७ वर्षीय तरुणीची घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ असे मयत तरुणीचे नाव असून, ती वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी वैष्णवी महाविद्यालयातून घरी आली होती. त्यावेळी घरात ती एकटीच होती. तिचे वडील संतोष यादवराव नीळ हे दहेगाव-बिडकीन मार्गावर पानटपरी चालविण्यासाठी गेले होते, तर आई मथुरा शेतात कामासाठी बाहेर गेली होती. वैष्णवीचा भाऊ प्रीतेष सकाळीच शाळेत गेला होता. घर रिकामे असल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून वैष्णवीचा गळा चिरून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दुपारी काही वेळाने संतोष नीळ यांनी पत्नी मथुरा यांना फोन करून वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे सांगितले. यानंतर मथुरा व इतर नातेवाइकांनी तातडीने घरी धाव घेतली. घरात प्रवेश केल्यानंतर वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ बाहेर ओसरीत आणण्यात आले; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत. आरोपी लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,871 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क