छत्रपती संभाजीनगर : बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह महाविद्यालयात गेलेल्या एका तरुणावर दोन जणांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडको कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयात घडली. या हल्ल्यात तरुणाच्या छाती, पाठीवर आणि गळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (१६ जून) दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी मुजाईद वाहिद कुरेशी (वय २४, रा. हर्सूल सावंगी) यांच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात सुफियान पठाण आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजाईद कुरेशी हा त्याची बहीण रश्मीन फातेमा कुरेशी (वय १९) हिच्यासोबत बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात गेला होता. प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ सुरू असल्याने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दोघेही महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये बसले होते.
यावेळी दोन युवक तेथे आले आणि त्यांनी मुजाईद व त्याच्या बहिणीकडे संशयाने चौकशी सुरू केली. मुजाईदने आपण बहीण-भाऊ असल्याचे सांगितल्यानंतरही आरोपी संतापले. त्यातील एका आरोपीने फोनवर कोणाशी तरी बोलत शिवीगाळ केली आणि अचानक चाकू काढून मुजाईदच्या छातीवर वार केला.
हल्ल्यादरम्यान दुसऱ्या आरोपीने मुजाईदला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवरही वार करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याच्या गळ्यावर वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र मुजाईदने प्रसंगावधान राखत मान खाली घेतल्याने वार दाढीच्या भागावर लागला आणि मोठी दुर्घटना टळली.
हल्ल्यानंतर आरोपींनी रश्मीनला धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील दोन युवकांनी जखमी मुजाईदला तातडीने मदत करत रुग्णालयात नेले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलीस करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*