छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी नशेखोरीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या, १०० बटन गोळ्या आणि होंडाई कार, मोबाईल हँडसेट असा एकूण ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची नावे अशी आहेत – कल्पेश चंदुलाल अग्रवाल (३८, रा. साक्री रोड, धुळे), सय्यद नबी सय्यद लाल (३७, रा. जोगेश्वर एमआयडीसी, वाळूज), दुर्गेश सीताराम रावत (५४, रा. इंदूर, मध्यप्रदेश) आणि धर्मेंद्र ऊर्फ गोपाल खेमचंद प्रजापती (३२, रा. अहमदाबाद, गुजरात). आरोपींना न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आमखास मैदान परिसरात कारवाई करून कल्पेश अग्रवाल आणि सय्यद नबी यांना प्रथम ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चौकशीत मिळालेल्या धागेदोरांवरून तपास गुजरात आणि मध्यप्रदेशापर्यंत पोहोचला. त्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त संपत शिंदे, निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने इंदूर येथून दुर्गेश रावत आणि अहमदाबाद येथून धर्मेंद्र प्रजापती या दोन वितरकांना अटक केली.

तपासात उघड झाले की, कल्पेश अग्रवाल हा पूर्वी धुळ्यातील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. २०१७ पासून त्याने नशेच्या औषधांच्या काळाबाजारात पाऊल ठेवले आणि फक्त आठ वर्षांत ‘नशेचा सम्राट’ बनला. त्याने बनावट मेडिकल परवान्याच्या आधारे गुजरातमधील प्रजापतीकडून आणि इंदूरमधील रावत यांच्याकडून कोडीन सिरप आणि बटन गोळ्या खरेदी सुरू केली. ही औषधे खासगी बस आणि पार्सलद्वारे धुळ्यात आणली जात आणि नंतर मराठवाड्यासह राज्यभर वितरित केली जात होती.

कल्पेशने शहरात पेडलरचे जाळे उभारले होते. त्याचा मुख्य साथीदार सय्यद नबी हा २०१८ मध्येच वाळूज पोलिसांच्या कारवाईत सापडला होता. त्यावेळी त्याच्या घरातून नशेच्या गोळ्या आणि तीन तलवारी जप्त झाल्या होत्या. या वेळी तो पुन्हा कल्पेशसाठी सक्रियपणे काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

इंदूरमधील आरोपी दुर्गेश रावत हा ‘कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणारी सामाजिक संस्था चालवतो’ असा खोटा आव आणून नशेचा काळाबाजार चालवित होता. तर अहमदाबादचा धर्मेंद्र प्रजापती हा धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्पेशच्या संपर्कात आला आणि तेथूनच या गोरखधंद्याची सुरुवात झाली.

केवळ एक ते पाच रुपयांना मिळणारी बटन गोळी ते पन्नास रुपयांना विक्री करून आरोपींनी अल्पावधीत लाखो रुपयांची कमाई केली. पोलिस तपासात अनेक नवे धागेदोरे समोर येत असून या नेटवर्कमध्ये आणखी काही जण सामील असल्याचा संशय आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त संपत शिंदे, निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, दिलीप मोदी आणि त्यांचे सहकारी यांच्या पथकाने केली. या भव्य कारवाईमुळे नशेखोरीविरुद्ध पोलिसांची ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम अधिक जोमाने पुढे गेली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,016 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क