छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून त्यावरून नामांकित व्यक्तींना पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि. ४) सायबर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या बनावट खात्यामागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करण्यात आले असून त्या खात्यातून अनेक ओळखीच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना संदेश पाठवून आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत होती. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले की, “जिल्हाधिकारी यांच्या नावाने तयार झालेल्या बनावट खात्याची तपासणी सुरू असून त्या खात्याशी संबंधित लिंक आणि सर्व तांत्रिक माहिती मेटा कंपनीला पाठवण्यात आली आहे. खात्याचा IP अ‍ॅड्रेस, मोबाईल नंबर आणि इतर तपशील मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अशा प्रकारच्या बनावट सोशल मीडिया खात्यांच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने खाती तयार करून पैशांची मागणी करण्याचे प्रकार आधीही घडले आहेत. यापूर्वी धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नावाने तब्बल २५ पेक्षा अधिक बनावट खाती उघडून अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि अस्तिककुमार पांडेय यांच्या नावानेही बनावट खाती सक्रिय असल्याचे समोर आले होते. प्रशासनाने नागरिकांना अशा बनावट खात्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

769 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क