छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती क्रांती चौकात सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या १७ वर्षीय तरुणीकडे एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने अश्लील इशारे करत त्रास दिला. मात्र, ही तरुणी न घाबरता थेट पोलिसांकडे गेली आणि त्या विकृताला पोलिसांसमोर चांगलाच चोप देत त्याचा माज उतरवला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि.३) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील ही तरुणी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरात वास्तव्यास आहे. ती क्रांती चौक परिसरात आपल्या मैत्रिणीची वाट पाहत असताना, खिवाराम कानाराम देवासी (वय ४८, रा. हुबळी, कर्नाटक) या व्यक्तीने तिच्याकडे पाहून अश्लील चाळे सुरू केले. सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केले, परंतु आरोपी थांबला नाही. उलट, त्याने नोटा दाखवत आणखी अश्लील इशारे केले. धाडसाने वागणाऱ्या या तरुणीने ताबडतोब जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांकडे धाव घेत सर्व घटना सांगितली.
यानंतर पोलिसांनी दामिनी पथकाला माहिती दिली. काही क्षणांतच पथकातील अधिकारी निर्मला निंभोरे आणि पोलीस निरीक्षक सुनील माने घटनास्थळी दाखल झाले. या वेळी आरोपीने पोलिसांच्या उपस्थितीतही अश्लील हालचाली सुरूच ठेवल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने स्वतःच पुढे जात आरोपीला चोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थित नागरिकांनी तरुणीच्या धैर्याचे कौतुक केले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांनी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले आणि दामिनी पथक प्रमुख कांचन मिरधे यांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपी खिवाराम देवासी हा विवाहित असून सध्या पुण्यात कामानिमित्त स्थायिक आहे. त्याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात अश्लील वर्तन, छेडछाड आणि सार्वजनिक ठिकाणी अनुचित कृती केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आहे आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*