छत्रपती संभाजीनगर : शहरात बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या एका रात्रीत उस्मानपुऱ्यासह सातारा परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना घडल्याने पोलिस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. चोरटे विशेषतः घर बंद असल्याची खात्री करून नियोजनबद्ध पद्धतीने हात साफ करत असल्याचे चित्र समोर येत आहे.

उस्मानपुऱ्यात १३ फेब्रुवारीच्या रात्री एका बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ३७ तोळ्यांहून अधिक सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याच रात्री सातारा परिसरातही दोन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या. अक्षय प्रभाकरराव बाबरे हे खासगी नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उघडले आणि सोन्याची चेन, मंगळसूत्र तसेच चांदीचे शिक्के असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, गणेशप्रसाद तिवारी हे पुण्याला कार्यक्रमासाठी गेलेले असताना अवघ्या वीस मिनिटांत त्यांच्या घरात चोरी करण्यात आली. मध्यरात्री दोन अज्ञात चोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करत साडेपाच हजार रुपये रोकड आणि दारात उभी असलेली मोपेड पळवली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना काही मिनिटांत घडल्याने चोरटे किती सराईत आहेत, हे स्पष्ट होते.

एकाच रात्रीत घडलेल्या या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अतिरिक्त सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

601 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क