छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे भाजप-शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शनिवारी (११ ऑक्टोबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘हंबरर्डा मोर्चा’ निघणार असल्याने शहराचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
भाजपची मराठवाडा विभागीय नियोजन बैठक छत्रपती संभाजीनगर येथील जिमखाना क्लबमध्ये होणार असून, मुख्यमंत्री फडणवीस दुपारी साडेचार वाजता या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) चा कार्यकर्ता मेळावा संत एकनाथ नाट्यमंदिरात दुपारी तीन वाजता होणार आहे. या मेळाव्यानंतर सव्वाचार वाजता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल. पालकमंत्री संजय सिरसाट, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.
दुसरीकडे, शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘हंबरर्डा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून होणार असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, कर्जमुक्ती, पीकविमा निकष पूर्ववत ठेवावेत आणि जनावरे तसेच घरांच्या नुकसानीची संपूर्ण मदत द्यावी या मागण्या करण्यात येणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पक्षांमध्ये शक्तिप्रदर्शनाची रंगत पाहायला मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*