वाळूज : ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्स या संकेतस्थळावरील जाहिरात एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. जुनी दुचाकी विक्रीसाठी काढलेल्या युवकाची मोटारसायकल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातोहात पळवून नेल्याची घटना वाळूज येथील मनीषा नगर परिसरात घडली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मनीषा नगर येथील सचिन सुभाष तागड (वय २७) यांनी त्यांच्याकडे असलेली यामाहा कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच-२० जीडब्ल्यू-५५१०) विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. जाहिरात पाहिल्यानंतर एका व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधत गाडी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सोमवारी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली.

गाडीची पाहणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीने “मी गाडीची एक चक्कर मारून येतो,” असे सांगत मोटारसायकल ताब्यात घेतली. मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही तो परत न आल्याने सचिन तागड यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने “दोन मिनिटांत परत येतो,” असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला आणि तो पसार झाला.

बराच वेळ प्रतीक्षा करूनही आरोपी परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सचिन तागड यांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून रविवारी (दि. १४) अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जोनवाल यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार खोसरे करत आहेत. तसेच ऑनलाइन माध्यमातून वाहन खरेदी-विक्री करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

304 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क